मोतीपालनामध्ये व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. शिंपल्यावर सर्जरी केल्यानंतर मोती तयार होईपर्यंत त्याची निगा राखावी लागते. व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही तर शिंपले मरण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे वेळच्या वेळी पाणी बदलणे, फिडिंग करणे, मेलेले शिंपले बाहेर काढणे या गोष्टी मोतीपालकाला कराव्या लागतात.
सर्वसाधारणपणे एका शिंपल्यातून दोन डिझाईनर मोती एका वर्षात तयार होतात. एका शिंपल्याचा विचार केला तर वर्षभरात ३० ते ४० रूपये खर्च येतो. ज्यामध्ये खरेदीपासून व्यवस्थापनाचा सर्व खर्च येतो. आणि त्यातून वर्षाअखेरीस दोन मोती तयार होतात. या एका मोत्यांची किंमत कमीत कमी १०० रूपयांच्या आसपास असते. त्यामुळे एका शिंपल्यातून वर्षाकाठी २०० रूपये मिळू शकतात.
तुमच्या उपलब्ध जागेनुसार तुम्ही शिंपल्यांची संख्या वाढवू शकता. साधारणपणे ५ फूट बाय ५ फूट जागेमध्ये १ हजार ५०० शिंपले बसतात. जागा, भांडवल आणि व्यवस्थापनाची सोय या गोष्टींचा विचार करून सेटअप बनवता येतो. ५०, १००, २०० किंवा ५०० शिंपल्यांपासूनही छोट्या घरगुती सेटअपची सुरूवात करता येते.
मोतीपालन हा कमीत कमी जागेत, कमीत कमी खर्चात, कमी कष्टामध्ये करता येणारा आणि चांगला नफा देणारा व्यवसाय आहे. हा व्यवसाय गॅलरीमध्ये, टेरेसवर, पार्किंगमध्ये आणि मोकळ्या जागेतही करता येतो. महिलांसाठी, बेरोजगार तरूणांसाठी, नोकरी किंवा व्यवसाय करता करता नव्या संधी शोधणाऱ्यांसाठी हा व्यवसाय उत्तम आहे.