Indoor Saffron Farming : केशर शेती ही काश्मीरमध्ये थेट शेतात म्हणजे ओपन क्लायमेटमध्ये केली जाते. पण महाराष्ट्रात बंद खोलीमध्ये ज्यावेळी केशर शेती केली जाते. त्यावेळी आपण त्यासाठी मानवनिर्मित वातावरण तयार करत असतो. त्यामुळे काश्मीरमधील आणि महाराष्ट्रातील बंद खोलीतील केशर उत्पादनात फरक पडू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, आपण एका १० फूट बाय १० फूट रूममध्ये २०० किलो कंद ठेवून केशर उत्पादन घेऊ शकतो. ज्यामध्ये तुम्हाला ४ महिन्यांमध्ये साधारण ४०० ते ४५० ग्रॅम केशरचे उत्पादन होऊ शकते. जर व्यवस्थापन नीट झाले नाही तर उत्पादनामध्ये घट किंवा वाढही होऊ शकते. त्यामुळे तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थापन केले पाहिजे.
तुम्ही तयार केलेल्या केशरला बाजारात किंमत किती मिळते त्यावर तुमचे उत्पन्न अवलंबून आहे. बाजारामध्ये भेसळयुक्त केशर आणि तेल काढून घेतलेले केशर मिळते. त्यामुळे केशरच्या किंमतीचा अंदाज बांधता येत नाही. पण तरीही २०० ते १८०० रू. ग्रॅमप्रमाणे बाजारात केशर विक्री सुरू असल्याची माहिती आहे.
प्रत्येक ग्राहकाशी वैयक्तिक संवाद साधून त्याला आपल्या उत्पादनाची माहिती दिली तर नक्कीच आपले केशर जास्त दराने विक्री केले जाऊ शकते. त्यामुळे बंद खोलीमध्ये केशर उगवण्याआधी मार्केटचा विचार करणे जास्त सोईस्कर ठरते.