Saffron Farming technique : केशर हा जगातील सर्वांत महागडा मसाल्याचा पदार्थ असून त्याची किंमत साधारण २ लाख रूपये किलोपासून १७ ते १८ लाख रूपये किलोपर्यंत असते. भारतामध्ये केशरची शेती ही साधारणपणे काश्मीर मध्ये केली जाते. पण महाराष्ट्रात बंद खोलीमध्ये किंवा कंटेनरमध्ये केशर शेती करण्याचे प्रयोग अनेकांनी यशस्वी करून दाखवले आहेत.
महाराष्ट्रात केशर उगवण्यासाठीचे वातावरण नसल्यामुळे बंद खोलीमध्ये कंट्रोल क्लायमेट तयार करून केशर उगवावे लागते. यासाठी ० डिग्री सेल्सिअसपासून ३० डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमानाची आवश्यकता असते. पाणी आणि मातीचा वापर न करता केशर उगवले जाते आणि या पद्धतीला एरोपोनिक तंत्रज्ञान असे म्हणतात.
बंद खोलीत केवळ आर्द्रता आणि तापमानावर आधारित केशर पिकवले जाते. ज्यामध्ये आपल्याला कुलिंग मशीन, ह्युमिडीफायर, डी-ह्युमिडीफायर अशा उपकरणांचा वापर करावा लागतो.
केशरला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. भारतात सर्वसाधारणपणे ७० टक्के केशर आयात केले जाते. त्यामुळे भारतात केशर उत्पादनासाठी अमाप संधी उपलब्ध आहेत. कमी जागेत, कमी वेळेत चांगला नफा कमावून देणारा व्यवसाय म्हणून याकडे पाहिले जात आहे.